बौद्ध समाज
बौद्ध समाज
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 06 Oct 2019, 08:59:00 AM
विद्यमान बौद्ध हे नागवंशीय असून ते या भूमीचे मूळ रहिवासी व राज्यकर्ते होते. आर्यपूर्व काळात नागलोकांची संस्कृती येथे अस्तित्वात होती. नागलोक म्हणजेच आजचे बौद्ध वा महार लोक होत. नागवंश हा भारतातील एक प्राचीन वंश आहे.

बौद्ध समाज
पुराणातील उल्लेखानुसार नागराजांनी विदिशा, मथुरा, कांतिपुरी व पद्मावती या ठिकाणी राज्य केले. महाराष्ट्र ही तर नागांची मायभूमीच होती. दक्षिण भारतात नागांची अनेक लहान लहान राज्ये होती. महाराष्ट्रातील नागराजे ‘महारठी’ ही पदवी धारण करीत. सातवाहन काळात ‘कळलाय’ हा नागराजा कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र या प्रदेशावर राज्य करीत होता. त्याने आपली कन्या नागनिका हिचा विवाह सातवाहन राजा सिमुक सातकर्णीबरोबर केला होता. नागनिका ही सिमुक राजाची पट्टराणी होती. तिने अनेक यज्ञयागादी दानकर्मे केली. त्यासंबंधीचे कोरीव लेख नाणेघाटातील लयनगृहातील भिंतीवर पहायवास मिळतात.
कोकण हा प्रांत मुळात महार, मांग, भिल्ल, कोळी, ठाकूर व कोंग या लोकांचा होता. परंतु कदंबानी महारांचा, चालुक्यांनी मांगाचा व मौर्यानी कोळ्यांचा पराभव करून त्यांची राज्ये जिंकून घेतली. त्यामुळे या भूमीचे भूमिपुत्र बेवारस झाले. आठव्या शतकापासून जातीची बंधने घट्ट होऊ लागली. जेते लोकांनी जीत लोकांना गुलामासारखी वागणूक द्यावयास सुरुवात केली. नागवंशीय महार हे राज्यकर्ते होते. पण राजकीय पराभवातून ते हतबल, निष्कांचन व हीन अवस्थेला पोहोचले. याचा परिणाम एकमेकांच्या सहकार्याने चालत आलेल्या पंचायतराज वा गावगाड्यावरही झाला. शिवकाळात व विशेषत: पेशवेकाळातील बहुतांश निवाडे हे अस्पृश्य व दलित समाजाविरुद्ध एकतर्फीच झाल्याचे दिसून येते. पेशवेकाळात माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनिष्ट प्रथांना काही धरबंधच राहिला नाही, हा इतिहास आहे. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी पंचायत समिती स्थापन करून प्रबोधन कार्यास चालना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे भारतात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी चालना मिळाली. ठाण्यासह महाराष्ट्रातही सर्वच भागात बौद्ध लोक आहेत. १४ ऑक्टोबर १९५६ पूर्वी हा समाज सगळीकडे महार समाज म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी हा समाज अत्यंत अवमानित व निकृष्ट जीवन जगत होता. डॉ. आंबेडकरांनी अस्पृशांच्या उद्धारासाठी महान प्रयत्न करून प्रबोधन कार्यास गती दिली. त्यांच्याच प्रेरणेनुसार बऱ्याच दलितांनी धर्मांतर करून बौद्ध धर्माचा अंगिकार केला. महाड येथे १९ व २० मार्च १९२७ आणि २५ व २६ डिसेंबर १९२७ अशा दोनवेळा चवदार तळे सत्याग्रह करून आंबेडकरांनी नव्या प्रेरणांची रुजवात केली. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर थोड्याच दिवसांनी म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.
१४ एप्रिल व ६ डिसेंबर अनुक्रमे डॉ. आंबेडकरांचा जन्म दिन व महानिर्वाण दिन म्हणून पाळतात. दसरा हा धम्मचक्र परिवर्तन दिन व वैशाखी पौर्णिमा बुद्धजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरे करतात. या दिवशी मिरवणुका व त्यास जोडून जाहीर सभा घेतल्या जातात. ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाऊन हॉलशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बौद्ध समाज प्रचंड संख्येने मानवंदना देण्यासाठी जमतात. ठाण्यातील आंबेडकर रोडवरील दोन्ही दिवशी मोठे कार्यक्रम होतात.
गर्भमंगल, नामकरण, अन्नप्राशन, केशकर्तन, कान टोचणे, विद्यारंभ, विवाह व अंत्यसंस्कारापैकी नामकरण, विवाह व अंत्यविधी प्रामुख्याने करतात. मुलाच्या जन्मानंतर पाचव्या, सातव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरणविधी करतात. बहुतेक तो बाराव्या दिवशीच करण्याचा प्रघात आहे. त्यावेळी अर्भक तसेच आईवडिलांनी पांढरे कपडे परिधान करायचे असतात. भगवान बौद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या तसबिरींनी पांढरी फुले व हार घालतात. समोर उदबत्त्या व पाचपदरी पांढरा धागा बांधतात. भन्ते किंवा बौद्धाचार्य त्रिसरण व पंचशील म्हणतो. धाग्याचे एक टोक आपल्या हातात धरतो व बाकीचा धागा नवजात मूल, त्याचे आईवडील व उपस्थितांच्या हातात देतो. यानंतर तो बुद्ध, धम्म व संघवंदना तसेच रतन सुत्त, करणीयमेत सुत्त, महामंगल गाथा इत्यादी म्हणतो व पूजापाठ झाल्यावर तो मुलाचे नाव जाहीर करतो. त्याचवेळी धागा मुलाच्या व आईवडिलांच्या, आप्तेष्ट व इतरांच्या हातात बंधतो. धाग्यास फार पवित्र मानतात. सर्वसाधारण असा तऱ्हेचा कुंभाचा विधी सर्व धार्मिक विधीच्या वेळी तसेच परित्राण पाठ करतेवेळी करतात. कुंभातील पाणी तीर्थ म्हणून घेतात.
प्राचीन काळापासून ठाण्याच्या ग्रामव्यवस्थेचा भाग असलेला, विद्यमान बौद्ध समाज ठाणे परिसरात सर्वत्र मिसळून गेला आहे. ठाणे शहरात आंबेडकर चौक, खारटन रोड येथे प्रामुख्याने त्यांची वस्ती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रभावित या समाजाने शिक्षण घेऊन शिक्षक, शासकीय सेवा, सेनादल आणि विविध उद्योग क्षेत्रांत प्रगती करून राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या सबल होत आधुनिक झेपावणाऱ्या ठाण्याच्या वाटचालीत त्यांचीही पावले उमटली आहेत.
Comments
Post a Comment